A Horse

A Horse 

झालोच घोडा तर

A Horse

घोड्यावर स्वार होण्याची ईच्छा प्रत्येकाच्या मनात संपूर्ण आयुष्यात एकदा तरी येऊन गेली असेलच ना. खोगीर हे घोड्याच्या पाठीवर पट्ट्याने बांधले जाते आणि त्यावर आरामशीर बसून आपण घोड्याची सवारी करू शकतो.

जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये घोड्याचे डोळे सर्वात मोठे असतात. त्यांचे डोळे 360 अंश पाहण्यास सक्षम आहेत परंतु घोडा मनुष्याप्रमाणे लक्ष केंद्रित करण्यास सक्षम नाही म्हणूच घोड्याच्या डोळ्याला झापड लावली जाते. नर घोड्याचा जबडा त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो. नर घोड्याला ४० आणि मादीला ३६ दात असतात. घोडा हा तसा जगभरात आढळणारा प्राणी आहे, त्याच्या बद्दल आपल्याला बरीचशी माहिती असेलही ह्या बद्दल शंका नाही. आता ज्या विषयाबद्दल लिहिणार त्या विषयाबद्दल थोडी तरी माहिती असावी म्हणून हा खटाटोप.

A Horse

मी आज पर्यन्त जंगली घोडे कधी जवळून पहिले नाही. मी पाहिलेल्या घोड्याच्या दोन्ही डोळ्यावर एक झापड लावलेली असते तो घोडा सैरावैरा कुठेही धावू नये म्हणून. अश्या घोड्याना रेसकोर्स वरच्या धावपट्टीत पळवले जाते. लाखोची उलाढाल असते ह्या खेळात. जिवाच्या आकांताने चाबकाचे फटके आणि लगाम खेचली की  नाकात होणाऱ्या तीव्र वेदनेने मग घोडा वाऱ्याच्या वेगप्रमाणे पळू लागतो. शर्यत जिकली, पुढे काय? बाबा कशा साठी धावतोस विचारल्यावर चाबकाचे फटके आणि लगाम खेचली की  नाकात होणाऱ्या तीव्र वेदनेने बहुदा हेच उत्तर तो ही देईल. ह्यात बक्कळ पैसा कमावतो तो त्या घोड्याचा मालक. सर्वत्र कौतुक त्या मालकचं, घोड्याच फक्त नाव. 

अजून एका घोड्याला अशीच पट्टी लावलेली असते! तो सर्कस, चौपाटीवर फेऱ्यामारणे आणि फारतर नवऱ्याच्या वरातीत नाचण्याचे काम करतो. बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना बहुतेक त्यालाच म्हणत असावेत असं मला वाटतं.

रेसकोर्स मधला घोडा भरधाव वेगाने धावताना पडला की गोळी मारली जाते, अधू झालेल्या घोड्याचे होणारे त्रास त्याच्या मालकाला सहन होत नाही म्हणून गोळी मारतात असं म्हणतात. फार अंती विचार केला तर हे आपल्या मनाला पटत का सरळ सांगाना जखमी घोडा पोसायला डोईजड होतो म्हणून. 

दुसरे आपले सर्कस, चौपाटीवर फेऱ्यामारणे आणि फारतर नवऱ्याच्या वरातीत नाचण्याचे काम करणारे बाबुराव घोडे. हा प्राणी घोड्या सारखा दिसतो म्हणून त्याला घोडा म्हणायचे. मूठभर मांस सुद्धा नसतं ओ त्याच्या अंगावर. देव जगावतोय म्हणून जगायचं अशी त्याची अवस्था.

A Horse

मी सुद्धा ह्या आयुष्य रुपी प्रांगणात धावणारा एक घोडा आहे. पण मी माझ्या डोळ्यावरची ती झापड काढून टाकली आहे. कारण मला धावायचं आहे पण जखमी झाल्यावर गोळी खाऊन मारायचे नाही किंवा सर्कस, चौपाटीवर फेऱ्यामारणे आणि फारतर नवऱ्याच्या वरातीत नाचण्याचे काम करणाऱ्या घोडसारखं मेहनत करून मालकच पोट भरून स्वतः च्या अंगा मांसाची हाड करून घेण्यात मला काही रस नाही. 

मला जगायचं आहे स्वछंद आणि मस्त आयुष्य. धावायचं आहे मला वाऱ्यापेक्षा ही जास्त वेगाने. सैरभैर, मन करेल तिथे आणि मनाला वाट्टेल तिथे. झालोच घोडा तर चेतक होईल, झालोच घोडा तर चेतक होईल, महाराणा प्रतापां सोबत माझं ही नाव ही जनता आदरानं घेईल.

लेखन :- मनिष महादेव जोशी


कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA