STATUS
STATUS
स्टेटस म्हणजे सद्यस्थिती!
काही मुलं मुलींशी ओळख झाली की त्यांना पटवण्यासाठी स्टेटस ठरवतात, सध्या सोशल मीडियावर वर अशी रेडीमेड स्टेटस मिळतात. त्यानंतर मग डायलॉग चालू, मी ऐकलेला खतरनाक डायलॉग सोनू मला तुझ्यासारखीच गर्लफ्रेंड हवी. आता मी जास्त काही लिहिलं तर उगाच ती उणी धुणी काढल्यासारखं होईल म्हणून मी जास्त काही लिहीत नाही. असे पुष्कळ फंडे वापरून, मित्रांची सोबत घेऊन मुली यांच्या प्रेमात पडतात ही! पण असे नतभ्रष्ट कार्टे माती खायची सोडतील कशी?
अचानक यांचा बर्थडे येतो आणि वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोज नाकारणारे, व्हाट्सअप किंग, आपले लाडके बंधू, तसेच मुलींचे लाडके, सगळ्या मुलांना आणि मुलींना जीव लावणारे, लाखो मुला मुलींची धडकन, पोरींना आपल्या स्माईल वर फिदा करणारे, बोलणं दमदार वागण जबाबदार, छान व्यक्तिमत्व, दिसायला एखाद्या हिरोला पण लाजवणारे, कॅडबरी बॉय, आपले लाडके, गोजिरे, सहा मुलींनी प्रपोज केलेले, दोन मुलींना नाकारलेले, दोन मुलींना वेटिंग वर ठेवलेले आणि त्यातील एकीला वहिनी बनवणारे आपले लाडके भाऊ यांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आता ती मुलगी पण समजून जाते याच्याकडे काही नाही जे काही आहे ते याच्या मित्राकडे आहे मग ती सुद्धा आपला मोर्चा याच्या मित्राकडे वळवते या अशा भिक्कार..... कधीच पोरी पटत नाहीत. मग अशे महाशय असतात मित्राच्या लग्नात अक्षता आणि भात वाढायला.
वेळोवेळी भेटायला जाऊन गेल्यावर खायला घालून पदरचे पैसे संपलेले असतात मग हळूहळू याचा कल दाढी वाढवण्याकडे लागतो अचानक कोणीतरी याच्यासारखाच माकडछाप याला मोठ्याने ओरडून काय छावा आज कुठे! झालं मग काय 100 ग्रॅम चेहऱ्यावर अर्धा किलो दाढी वाढवून कपाळावरती चंद्रकोर लावून जणू आपल्या अंगात 100 हत्तीचे बळ असल्याचा आव आणित ह्या प्राण्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. मग काय स्टेटसला सकाळ संध्याकाळ राजेच राजे.
खरंच विचारांती असं वाटतं कधीतरी राजे या स्टेटस मधून बाहेर येतील आणि अश्या हरामखोरांचं मुस्कट फोडतील. कारण दाढी वाढवून आणि कपाळी चंद्रकोर लावून छत्रपती जन्माला येत नाहीत, छत्रपती जन्माला येतात ते विचारांतून. तुमच्यातला एक चांगला विचार म्हणजे एका छत्रपतींनी घेतलेला जन्म असतो. आपले स्वतंत्र विचार, आपलं प्रांजळ मत हेच आपलं स्टेटस.
जय जिजाऊ, जय शिवराय!
लेखन :- मनिष महादेव जोशी
Comments
Post a Comment